मंडळी हिंगोली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा गैरवापर उघडकीस आला असून, चार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या लाभार्थींनी आतापर्यंत सहा हप्ते उचलले आहेत. शासनाच्या आवाहनानंतर त्यांनी स्वतः अर्ज सादर करून लाभ बंद करण्याची विनंती केली, त्यातून हा प्रकार समोर आला आहे.
साडेतीन लाख महिलांचे अर्ज, आठ जणांनी लाभ बंद करण्याची मागणी
हिंगोली जिल्ह्यातून सुमारे 3.5 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. पंचायत समितीच्या स्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित महिलांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी शासनाने बोगस लाभार्थ्यांनी स्वतः पुढे येऊन लाभ बंद करण्याचे आवाहन केले. यानंतर जिल्ह्यात आठ जणांनी अर्ज सादर केला, ज्यामध्ये चार पुरुषांचा समावेश आहे.
सखोल चौकशी सुरू, कारवाईची शक्यता
या प्रकाराबाबत महिला व बालविकास अधिकारी राजेश मगर यांनी माहिती देताना सांगितले की, आम्हाला आठ अर्ज प्राप्त झाले असून, त्यातील चार पुरुष लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे. नेमकी नावाची चूक झाली आहे का, याचा तपास सुरू आहे. सत्यता आढळल्यास शासनाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल.
ही घटना समोर आल्यानंतर, योजनेच्या लाभार्थ्यांची नव्याने पडताळणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत चौकशी सुरू असून दोषींवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.