मित्रांनो राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर काही भागांत सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या नव्या अंदाजानुसार, लवकरच पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
डख यांच्या म्हणण्यानुसार ७ जूनपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाची सुरुवात होणार असून ७, ८, ९ आणि १० जून दरम्यान राज्याच्या विविध भागांत हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी ६ जूनपर्यंत शेतीची प्राथमिक कामं पूर्ण करून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
यावेळी हळद लागवड किंवा मूग पेरणी करण्यासाठी चांगला काळ असून मूग पिकासाठी लवकर पेरणी केल्यास अधिक उत्पादन मिळते, असेही डख यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय जमिनीत १ ते २ फूट खोलपर्यंत ओल गेली असल्याने उडीदसारख्या पिकांची पेरणी करण्यासही ही वेळ योग्य आहे.
१३ जूननंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. १३ ते १७ जून या कालावधीत राज्यभर जोरदार पावसाची शक्यता असून, याचा फायदा घेत बहुतांश भागांतील शेतकरी पेरणी पूर्ण करतील, असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हानिहाय अंदाज पाहता, ३ आणि ४ जून रोजी नंदुरबार, धुळे, मालेगाव, पारोळा आणि जळगाव या भागांत काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. कोकणात या दरम्यान पावसाच्या सरी सुरूच राहतील. कोल्हापूर परिसरात ३१ मे ते ७ जूनदरम्यान पावसाचे वातावरण राहील. तसेच १ ते ६ जूनदरम्यान महाराष्ट्रात कोरडे हवामान पूर्णता राहणार नाही. काही भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन अचानक सरी पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी हवामानातील या बदलांचा विचार करून शेतीची योजना करावी. पेरणीची घाई न करता मातीतील ओल आणि आगामी पावसाचा अंदाज पाहून निर्णय घेतल्यास पिकांची उगवण चांगली होईल आणि उत्पादनात वाढ होईल. हवामान अभ्यासकांनी दिलेल्या सूचनांचा योग्य उपयोग करून, निसर्गाशी जुळवून घेत शेती करणे हे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.