मंडळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यापूर्वी महिलांसाठी एसटी प्रवासात ५०% सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे महिलांना अल्प खर्चात लांब पल्ल्याचा प्रवास करणे सुलभ झाले. आता महिलांप्रमाणेच पुरुष प्रवाशांनाही सवलतीचा लाभ मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे.
आगाऊ आरक्षणावर १५% सवलत – जुलैपासून अंमलबजावणी
प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, गर्दी नसलेल्या हंगामात प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५% सवलत दिली जाणार आहे. ही योजना येत्या जुलै महिन्यापासून लागू होणार असून, ई-शिवनेरीसारख्या बस सेवांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना याचा विशेष फायदा होईल.
बदल्या आता ऑनलाईन – अधिक पारदर्शकतेसाठी नवा निर्णय
कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी, एसटी महामंडळाने सर्व बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सेवा जेष्ठतेनुसार बदल्या सुनिश्चित होतील.
७७ वर्षांचा समृद्ध वारसा – एसटीचा वाहननामा प्रकाशित
एसटी महामंडळ ही देशातील काही निवडक संस्था आहे, जी ७५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. आज ७७ वर्षांनंतरही एसटीचं सामाजिक जीवनातलं महत्त्व अबाधित आहे, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
या विशेष प्रसंगी बस फॉर अस या एसटी प्रेमी संस्थेने तयार केलेल्या एसटीचा वाहननामा या चित्रमय कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक एसटीच्या गेल्या ७७ वर्षांच्या प्रवासाची कहाणी रेखाटते.
कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.