मंडळी उन्हाळ्यात विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो, त्यामुळे वीजबिलही जास्त येते. याचे प्रमुख कारण म्हणजे एसी, कूलर, पंखे आणि फ्रिज यांसारख्या उपकरणांचा वाढलेला वापर. जर तुम्ही विजेच्या खर्चामुळे त्रस्त असाल, तर काही सोप्या उपायांचा अवलंब करून वीजबिल कमी करू शकता.
तुमच्या घरात वापरण्यासाठी 5-स्टार रेटिंग असलेली उपकरणे निवडा. ही ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे कमी वीज खर्च करतात आणि वीजबिल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. घरातील ट्युबलाईट आणि साध्या बल्बऐवजी एलईडी बल्ब वापरा. हे बल्ब कमी वीज वापरतात आणि जास्त प्रकाश देतात.
दिवसा घरातील खिडक्या आणि बाल्कनी उघड्या ठेवा, जेणेकरून सूर्यप्रकाश मिळेल आणि दिवे लावण्याची गरज भासणार नाही. पंख्यांचा योग्य वापर करा—खोलीत कोणी नसताना पंखे आणि इतर उपकरणे बंद करणे आवश्यक आहे.
मोबाइल किंवा लॅपटॉप पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जर प्लगमधून काढा. चार्जिंग पूर्ण झाल्यावरही चार्जर जोडून ठेवल्यास विजेचा अपव्यय होतो आणि उपकरणांच्या बॅटरीचेही नुकसान होते.
घरातील एसी, फ्रीज, कूलर यांसारख्या उपकरणांची वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घ्या. उन्हाळा सुरू होण्याआधी एसीची सर्व्हिसिंग करून घेतल्यास तो अधिक प्रभावी ठरेल आणि कमी वीज वापरेल.
मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रिक केटल, गीझर यांसारखी उपकरणे वापरल्यानंतर त्यांचे पॉवर बटण बंद करणे विसरू नका. अनावश्यकपणे चालू ठेवलेली उपकरणे वीजेचा अपव्यय करतात.
सोलर एनर्जीचा वापर करून विजेची मोठी बचत करता येईल. घराच्या छतावर सोलर पॅनल बसवल्यास सुरुवातीला खर्च जास्त वाटेल, पण नंतर वीजबिल कमी होईल आणि दीर्घकालीन फायदा मिळेल.
या छोट्या-छोट्या सवयी अंगीकारल्यास उन्हाळ्यात वीजबिल कमी होईल आणि विजेचा अपव्यय टाळता येईल.