मंडळी महाराष्ट्रातील अकोले तालुक्यातील धामणगाव पाट या दुर्गम आदिवासी गावाने रब्बी हंगामात सर्वाधिक ई-पिक पाहणी नोंदणी करण्याचा विक्रम केला आहे. महसूल विभाग व कोतूळ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिटच्या सहकार्याने पाच दिवसांत तब्बल ८० टक्के शेतकऱ्यांची ई-पिक नोंदणी पूर्ण करण्यात आली.
गावाची माहिती व आव्हाने
अहिल्यानगर जिल्ह्यातील धामणगाव पाट हे १३५८ हेक्टर शेती क्षेत्र आणि ३,००० लोकसंख्येचे गाव आहे. येथे १२०० खातेदार असून पूर्वी फक्त १० टक्के शेतकरीच पीक नोंदणी करायचे. या भागातील शेतकऱ्यांना मोबाईलवर स्वतः ई-पिक नोंदणी करणे कठीण जात होते.
एनएसएस शिबिराची भूमिका
२ ते ८ जानेवारीदरम्यान कोतूळ महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आयोजित केले. प्राचार्य डॉ. संजय ताकटे, कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुण वाकचौरे, प्राध्यापक, तसेच महसूल विभागातील तलाठी अतुल तिकांडे व पोलीस पाटील लक्ष्मण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर राबवण्यात आले.
५० विद्यार्थी आणि १० शिक्षकांनी ‘ई-पिक पाहणी ॲपचे प्रशिक्षण घेतले व १० गटांमध्ये विभागून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ॲपद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. प्रत्येक कुटुंबाला ॲप डाऊनलोड करून ते वापरण्यास शिकवले.
यशस्वी नोंदणी व पुढील कार्य
पाच दिवसांत १२०० पैकी ९२६ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली. यामुळे गावातील ५० टक्के शेतकऱ्यांकडे आता स्वतःच्या मोबाईलमध्ये ई-पिक पाहणी ॲप आहे, आणि ते इतर शेतकऱ्यांनाही मदत करीत आहेत.
दिशादर्शक उपक्रम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना संचालकांनी १४ जानेवारीला संपूर्ण युनिटला ग्रामीण भागात ई-पिक पाहणी प्रोत्साहित करण्याचा आदेश दिला. कोतूळ महाविद्यालयाचे प्रशिक्षित विद्यार्थी आता आसपासच्या भागातही शेतकऱ्यांना प्रशिक्षित करत आहेत.
महत्वाचा परिणाम
धामणगाव पाटमध्ये महसूल विभाग व एनएसएस स्वयंसेवकांनी केलेले कार्य आदर्शवत आहे. हा उपक्रम ग्रामीण विकासासाठी दिशादर्शक ठरू शकतो.
ग्रामीण भागासाठी ई-साक्षरता उपक्रम
एनएसएसने फक्त स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता ग्रामीण जीवनातील महत्त्वाचे प्रश्न ओळखून त्यावर काम करण्याचे उदाहरण दिले आहे. कोतूळ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ई-साक्षरता ही विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे.