मंडळी भारतात विविध आजारांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. एक व्हायरल संसर्ग संपतो न संपतो, तोच दुसऱ्या आजाराचा धोका समोर येतो. सध्या पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या दुर्बल करणाऱ्या न्यूरोलॉजिकल विकाराचे रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत तब्बल 22 रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे आढळली असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.
गुईलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?
गुईलेन बॅरे सिंड्रोम हा शरीरातील पेरिफेरल नर्वस सिस्टीमला प्रभावित करणारा विकार आहे. शरीराची प्रतिकारशक्ती चुकीच्या पद्धतीने काम करत नसांवर हल्ला करते. या आजारामुळे स्नायूंचा कमकुवतपणा, हात-पाय किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचा पॅरालिसिस, श्वसनाची अडचण, तसेच बोलणे व गिळणे कठीण होऊ शकते.
आजाराची कारणे
गुईलेन बॅरे सिंड्रोम मुख्यता व्हायरल संसर्गामुळे होतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असल्यास या आजाराचा धोका अधिक असतो. पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे यांनी सांगितले की, या आजाराचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
काळजी कशी घ्याल?
1) नियमितपणे हात स्वच्छ धुवा.
2) ताप किंवा इतर संसर्गग्रस्त रुग्णांपासून दूर राहा.
3) रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार आणि नियमित व्यायाम करा.
4) शरीरात कमकुवतपणा, मुंग्या येणे, किंवा संवेदनाहीनता जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आरोग्य विभागाने नागरिकांना या आजाराबाबत सतर्क राहण्याचे आणि लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. योग्य काळजी आणि तत्काळ उपचार यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवता येईल.