मंडळी आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन्ही महत्त्वाची ओळखपत्रे आहेत. सरकारी सेवांसाठी आधार कार्ड अनिवार्य असून, आर्थिक व्यवहार आणि कर प्रक्रियांसाठी पॅन कार्ड आवश्यक असते. पण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या कागदपत्रांचे काय होते, याबद्दल अनेकांना माहिती नसते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचे आधार कार्ड आपोआप रद्द होत नाही. सध्या आधार रद्द करण्यासाठी कोणतीही अधिकृत प्रक्रिया नाही. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी UIDAI कडे विनंती केल्यास आणि मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यास, त्या व्यक्तीचे आधार कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते.
पॅन कार्डच्या बाबतीत थोडी वेगळी प्रक्रिया आहे. मृत व्यक्तीचे पॅन कार्ड आपोआप निष्क्रिय होत नाही. कर संकलनाच्या दृष्टीने, अंतिम प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) दाखल होईपर्यंत पॅन कार्ड सक्रिय राहते. त्यानंतर कुटुंबीय किंवा नामनिर्देशित व्यक्ती आयकर विभागाकडे विनंती करून ते सरेंडर करू शकतात. काही प्रकरणांमध्ये, जसे की थकित कर किंवा कर्जाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, पॅन कार्डचा तात्पुरता वापर आवश्यक असतो.
मृत व्यक्तीच्या ओळखपत्रांचा गैरवापर टाळण्यासाठी, कुटुंबीयांनी लवकरात लवकर योग्य ती प्रक्रिया करून आधार आणि पॅन कार्ड संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावे. यामुळे भविष्यात कोणत्याही आर्थिक अथवा कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाहीत.