मंडळी मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेला इंडियन ऑइल (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतात. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे, तर घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाली होती. पण आता १ मार्च २०२५ पासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात आणखी ६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा नवीन दर ₹१,८०३ झाला आहे, जो फेब्रुवारीमध्ये ₹१,७९७ होता. तसेच, मुंबईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता ₹१,७५५.५० झाली आहे, जी फेब्रुवारीमध्ये ₹१,७४९.५० होती.
सणासुदीत वाढलेल्या किमतींचा परिणाम
मार्च महिन्यात होळी आणि रमजानसारखे महत्त्वाचे सण आहेत. तसेच लग्नसराईचा हंगामही सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत व्यावसायिक गॅसच्या दरवाढीचा फटका हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहक दोघांनाही बसण्याची शक्यता आहे.
घरगुती गॅसच्या किमती स्थिर
व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झालेली असली तरी, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइल आणि इतर पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅसचे दर जैसे थे ठेवले आहेत. त्यामुळे मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर अद्यापही ₹८०२.५० रुपयांना उपलब्ध आहे.