मंडळी राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. सध्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे ही प्रक्रिया मोफत केली जात आहे. पण लहान मुले आणि वृद्धांना बायोमेट्रिक पडताळणी करताना अडचणी येत असल्याने शासनाने Mera E-KYC हे मोबाइल ॲप कार्यान्वित केले आहे.
या ॲपच्या मदतीने लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वता आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे ई-केवायसी करू शकतात.
ई-केवायसी प्रक्रियेसाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया घरबसल्या सहज करता येते. फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी करता येते. रास्त भाव दुकानदार किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य ई-केवायसी करू शकतो. यासाठी आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम दोन आवश्यक ॲप डाउनलोड करावे लागतील. Mera E-KYC Mobile App आणि Aadhaar Face RD Service App हे दोन्ही ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.
दोन्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यांचे सेटअप करून आवश्यक परवानग्या द्याव्यात. त्यानंतर Mera E-KYC ॲप उघडून प्रक्रिया सुरू करता येईल. राज्य म्हणून महाराष्ट्र निवडावा, आधार क्रमांक टाकून ओटीपी प्रविष्ट करावा आणि दिलेल्या कोडची नोंद करावी.
फेस ऑथेंटिकेशन करताना समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करावा. ॲपमध्ये दिलेल्या सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करावी. जर दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असाल, तर बॅक कॅमेरा वापरावा.
ई-केवायसी प्रक्रिया यशस्वी झाली की नाही, हे E-KYC Status तपासून पाहता येईल. E-KYC Status – Y दिसल्यास प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच, लाभार्थ्याची माहिती स्वस्त धान्य दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल.
ही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी IMPDS KYC पर्यायाचा उपयोग करावा. ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ आहे, मात्र २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी.
रास्त भाव दुकानदारांनी लाभार्थ्यांना सहकार्य करून सर्वांची ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्याला अन्नधान्यापासून वंचित राहावे लागू नये.