मित्रांनो राशन कार्ड आधार लिंक नसल्यास स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही, असा स्पष्ट आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिला आहे. लातूर जिल्ह्यात ९८.७९% लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित २२,०५० लाभार्थ्यांनी अद्यापही आधार लिंक केलेले नाही. वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या लाभार्थ्यांचे मार्च-एप्रिलपासून धान्य वाटप थांबवले जाणार आहे.
लातूर जिल्ह्यातील ३.९८ लाख रेशन कार्ड धारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले १८.२२ लाख लाभार्थी दरमहा मोफत धान्याचा लाभ घेतात. शासनाने धान्य वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आधार कार्ड सीडिंग बंधनकारक केले आहे.
लातूर जिल्ह्यात आधार सीडिंगमध्ये निलंगा तालुका आघाडीवर असून, तेथे १००% लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग पूर्ण झाले आहे. मात्र, जळकोट आणि देवणी तालुक्यात ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अहमदपूर, औसा, चाकूर, लातूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ आणि उदगीर तालुक्यांमध्ये आधार सीडिंग जवळपास पूर्ण झाले आहे, परंतु काही लाभार्थी अद्याप बाकी आहेत.
शासन आदेशानुसार सर्व लाभार्थ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत आधार सीडिंग आणि ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. यानंतर ज्यांनी आधार लिंक केले नसेल, त्यांचा स्वस्त धान्य पुरवठा बंद केला जाईल. जिल्ह्यातील १,३५१ स्वस्त धान्य दुकानांमध्ये आधार सीडिंग सुविधा उपलब्ध आहे.
लातूर जिल्ह्यातील ३.९८ लाख रेशन कार्ड धारकांना १८.२२ लाख लाभार्थ्यांसाठी दरमहा २ किलो तांदूळ आणि ३ किलो गहू मोफत दिले जाते. आतापर्यंत १७.९९ लाख लाभार्थ्यांनी आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने आधार लिंक करून घ्यावे, अन्यथा मार्च-एप्रिलपासून धान्य वितरण थांबवले जाईल.
तुमचे रेशन कार्ड आधारला लिंक आहे का? २८ फेब्रुवारीपूर्वी लिंक करा आणि तुमच्या स्वस्त धान्याचा लाभ सुरू ठेवा.