नमस्कार मित्रांनो सध्या राज्यभर रब्बी हंगामाची कामे जोरात सुरू असून, शेतकरी कापूस वेचणीसाठी व्यस्त आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यात ढगाळ व दमट हवामान आहे, तर थंडी पूर्णता गायब झाली आहे. उत्तर दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांनी रोखले असून, अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढला आहे. यामुळे वातावरणामध्ये अचानक बदल झाला आहे.
राज्यात बुधवारी काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील फेंजल चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासांत हा पट्टा कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे व सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मुसळधार पाऊस होईल. सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतही पावसाचा यलो अलर्ट जारी केला गेला आहे.
मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा आहे. बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
थंडीचे प्रमाण कमी होण्यामागे दमट हवामान कारणीभूत आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांपासून बचावासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.