नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत 100 दिवसीय महाआवास अभियान 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देणे हा आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वितरित केले जाणार आहे.
ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी, गतिमान आणि दर्जेदार अंमलबजावणी करण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी हे अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. याअंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना 22 फेब्रुवारी 2025 रोजी मंजुरी पत्र वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याचे वितरण देखील या कार्यक्रमात होणार आहे.
हा कार्यक्रम दुपारी 04:45 वाजता पुण्यातील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हास्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण आणि पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात येईल. यावेळी विशेष ग्रामसभा आयोजित करून लाभार्थी आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती सुनिश्चित केली जाणार आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यासाठी 2050 घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 1976 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 1049 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे. अशी माहिती उत्तर सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
या 100 दिवसीय नियोजनात 13 लाख नवीन घरकुलांना मंजुरी दिली जाणार असून 3 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून 450 कोटी रुपये वितरित केले जातील. तसेच 1 लाख घरकुले पूर्णता बांधून तयार करण्यात येणार असून 5000 लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या अभियानाद्वारे ग्रामीण भागात गृहनिर्माणाच्या कार्यास अधिक गती मिळेल आणि लोकसहभाग वाढवून घरकुल योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली जाईल.