मंडळी राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांना आधार देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, त्या कुटुंबांतील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात. या योजनेची अंमलबजावणी गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून सुरू झाली असून, डिसेंबर महिन्यापर्यंतचे हफ्ते जमा करण्यात आले आहेत.
जानेवारीचा हप्ता आणि रक्कम वाढीची अपेक्षा
महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान लाडकी बहिणींना 2,100 रुपये देण्याची घोषणा केली होती. आता महायुती सरकार स्थापन झाल्यामुळे लाभार्थींना ही रक्कम कधीपासून मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र सध्या जानेवारी महिन्यासाठी 1,500 रुपयांचाच हप्ता देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारची भूमिका आणि चर्चा
या योजनेमुळे इतर सरकारी योजनांवर परिणाम होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर काही प्रमाणात मर्यादा येण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या विषयावर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
आदिती तटकरे यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्याचा हप्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तसेच, जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी खात्यात जमा होईल. पुढील तीन-चार दिवसांत लाभ मिळण्यास सुरुवात होईल. दरमहा महिलांना 1,500 रुपयांचा हप्ता मिळत राहील, आणि 2,100 रुपयांची रक्कम देण्याबाबत निर्णय नवीन अर्थसंकल्पानंतर घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जानेवारी महिन्यासाठी 1,500 रुपयांच्या हप्त्यासाठी सरकारने 3,690 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सरकारी योजनांवरील परिणाम
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या अन्य योजनांवर परिणाम होण्याची शक्यता असली, तरी सरकारने ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थी महिलांना यापुढेही नियमित लाभ मिळत राहील.
या घोषणांमुळे लाभार्थी महिलांना काहीसा दिलासा मिळाला असून, 2,100 रुपयांचा हप्ता लागू होण्याची प्रतीक्षा सुरूच आहे.