मंडळी राज्यात रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. पुढील काळात रेशनकार्ड प्रिंट स्वरूपात उपलब्ध होणार नाही. राज्य सरकारने रेशनकार्ड छपाई थांबवण्याचा निर्णय घेतल्याने, नागरिकांना आता ई-रेशनकार्डचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती नागपूर जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी दिली आहे.
या बदलाचा परिणाम फक्त नवीन अर्जदारांवर होईल. जुन्या रेशनकार्डधारकांना त्यांच्या विद्यमान रेशनकार्डवरूनच योजना लाभ घेता येतील. नव्या अर्जदारांना प्रिंट स्वरूपात रेशनकार्ड दिले जाणार नाही त्याऐवजी त्यांना ई-रेशनकार्ड दिले जाईल. हे ई-रेशनकार्ड विविध रंगांमध्ये असतील – पिवळे, पांढरे आणि केशरी. प्रत्येक रंगाने लाभार्थ्यांचा गट दर्शविला जाईल, ज्यामुळे योजना वितरण अधिक सुस्पष्ट होईल.
तसेच रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंकिंग अनिवार्य करण्यात आल्यामुळे सर्व नोंदी डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित केल्या जात आहेत. यामुळे प्रिंट रेशनकार्डची आवश्यकता कमी झाली आहे. राज्य सरकारकडे शिल्लक असलेल्या शिधापत्रिकांची वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फक्त ई-रेशनकार्ड प्रणाली सुरू केली जाईल, ज्यामुळे पारदर्शकता आणि डिजिटल व्यवस्थापनास चालना मिळेल.