नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना मदत करणे हा आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांतील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. याअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये थेट जमा केले जातात. ही योजना गेल्या जुलै महिन्यात सुरू झाली असून आतापर्यंत महिलांच्या खात्यात नऊ हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत.
या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याची चर्चा आहे. यासोबतच सरकार इतर योजनांसाठी असलेला निधी या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याउलट, महायुती सरकारने योजनेला कोणताही अडथळा न येऊ देता सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी सत्तेत आल्यास महिलांना दरमहा 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या घोषणेवर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सद्यस्थितीत याबाबत कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही, त्यामुळे लाभार्थी महिलांच्या 2,100 रुपयांच्या प्रतिक्षा कायम आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी, राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर योग्य वेळी निर्णय घेऊ, अशी भूमिका मांडली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया देताना सांगितले की,
लाडक्या बहिणींनी सरकारला ताकद दिली आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांना 2,100 रुपये देण्यात येतील.
आता राज्यातील लाखो महिलांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. विरोधक आणि सरकार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी महिलांना आश्वासन पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.