नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होत आहेत. कधी पाऊस, कधी उष्णता असे विरोधाभासी वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर मध्य आणि दक्षिण भारतात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये मात्र तीव्र उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पावसाचा इशारा
महाराष्ट्रात उन्हाचा प्रभाव वाढला असला तरी काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषता विदर्भ भागात तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून, येत्या दोन ते तीन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. कोकण विभागालाही या पावसाचा फटका बसू शकतो. याशिवाय मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी सतर्कतेचा सल्ला
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि केरळ भागात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. कर्नाटकमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे हवेत आर्द्रता वाढली आहे, ज्यामुळे उकाडा जाणवेल. याशिवाय ओडिशा आणि आसपासच्या भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामानातील या बदलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गरज नसल्यास उन्हाळ्यात घराबाहेर जाणे टाळा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा.