मंडळी राज्य सरकारने अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, त्याअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात.
या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण पडत असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांचा आरोप आहे की, इतर योजनांचा निधी या योजनेसाठी वळवला जात आहे. यामुळे या योजनेबाबत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात महायुतीने सत्ता आल्यास महिलांना दरमहा 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर, महिलांना या वाढीव रकमेचा लाभ कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या निर्णयाची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती, पण अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
यासंदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, 2,100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. सरकारने दिलेल्या वचनापासून ते मागे हटणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तटकरे यांनी विरोधकांवरही टीका केली. त्यांच्यानुसार, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासूनच विरोधकांनी तिची कधीच प्रशंसा केलेली नाही. ही योजना विरोधकांच्या मनात खुपत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या वक्तव्यादरम्यान त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे आयोजित कळसूआई महोत्सवासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.