मंडळी हवामान विभागाने पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात गारपीट होण्याची शक्यता असून, उर्वरित महाराष्ट्रात वादळी वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही वादळी वारे आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात वाऱ्याचा वेग ४०-५० किमी प्रतितास राहू शकतो आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने ठाणे आणि पालघर वगळता संपूर्ण कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर आणि जालना वगळता इतर सर्व जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, या भागांमध्ये गारपीट आणि वादळी वारे होण्याची शक्यता आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असून, तिथेही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानुसार, हा वादळी पावसाचा प्रभाव पुढील पाच दिवस कायम राहू शकतो. नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे.