नमस्कार मित्रांनो सध्या हवामान विभाग आणि हवामान तज्ञांकडून नवीन हवामान अंदाज जारी करण्यात आले आहेत. मागील दोन दिवसांपासून राज्यभरात ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्याच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. विशेषतः 31 मार्च रोजी नंदुरबार, नाशिक, धुळे, ठाणे, पालघर, सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
1 एप्रिल रोजी ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, रत्नागिरी, रायगड, संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.
हवामान खात्याने 3 एप्रिलपर्यंत राज्यभरात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावीत. तसेच पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करावी. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू असताना झाडाखाली थांबण्याचे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.