मंडळी सध्या राज्यभरात हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. सूर्यप्रकाश कमी असल्याने काहीसा गारवा जाणवत असला तरी उष्णतेची तीव्रता कायम आहे, ज्यामुळे नागरिकांना उष्माघात, थकवा यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अवकाळी पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस राज्यात काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये येत्या ४८ तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामानातील बदलांचे कारण
पूर्व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा अलिकडेच निवळला असला, तरी राजस्थानच्या पश्चिम भागापासून ते विदर्भाच्या उत्तरेपर्यंत एक नवीन कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल हवामान निर्माण झाले आहे. याशिवाय तापमान वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, यामुळे पावसाच्या शक्यता अधिक बळकट झाल्या आहेत.
नागरिकांनी घ्यावी काळजी
अशा बदलत्या हवामानामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढली आहे. ताप, सर्दी, खोकला यांसारखे त्रास सामान्यता अशा वातावरणात होतात. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि गरज नसल्यास उन्हात वावर टाळावा.