मंडळी सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद होत आहे. आज मुंबईतही पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान विभागानुसार (IMD), यावर्षी मान्सून वेळेआधी देशात दाखल होण्याची शक्यता आहे आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून यावर्षी १९ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रात प्रवेश करेल. यासोबतच तो आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागांतही दाखल होईल. नेहमीप्रमाणे हा मान्सून २२ मे रोजी या भागात पोहोचतो, त्यामुळे यंदा तीन दिवस आधीच मान्सून येणार आहे.
सामान्यता मान्सून १ जूनच्या सुमारास केरळमध्ये पोहोचतो आणि १५ जुलैपर्यंत संपूर्ण भारतभर पसरतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरात १०६% इतका पाऊस होईल, जो सामान्यपेक्षा जास्त मानला जातो.
१९७१ ते २०२० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरी पावसाचे प्रमाण ८७ सेंटीमीटर इतके आहे. गेल्या वर्षी देशात ९४.४% इतका पाऊस पडला होता, जो सामान्यपेक्षा कमी होता. २०२२ मध्ये मात्र १०६% पाऊस पडून तो सामान्यपेक्षा जास्त होता. आयएमडी मे महिन्याच्या अखेरीस एक अपडेट अंदाज जारी करणार असून, त्यात देशातील विविध भागांतील मान्सूनच्या स्थितीची माहिती दिली जाईल.