मंडळी विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्याघ्र प्रकल्पाशेजारील गावांतील शेतकऱ्यांसाठी 100% अनुदानित सौर कुंपण उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. यासंदर्भातील आदेश आधीच दिले असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाघाच्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये भीती
भंडाऱ्याजवळील कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. बीटी १० ही वाघीण आणि तिचा दोन वर्षांचा बछडा नरभक्षक असल्याची माहिती असून, स्थानिक नागरिकांनी त्यांना जंगलात सोडण्यास विरोध केला होता. वनविभागाने हा विरोध न जुमानता त्यांना जंगलात सोडले.
या घटनेमुळे गंडेगाव, सावरला, चन्नेवाडा, कन्हाळागाव, घानोरी, सिरसाळा, वायगाव आणि भुयार या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीतीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले असून, त्यांना भीतीमुक्त करण्यासाठी सौर कुंपण आणि चेन फेन्सिंग मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार आणि इतर सदस्यांनी विधानसभेत केली.
सरकारकडून ठोस उपाययोजना
वनमंत्री नाईक यांनी या मागणीवर उत्तर देताना सांगितले की, बीटी १० वाघिणीचा बछडा पकडून अन्यत्र हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी सौर कुंपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा हिस्सा रद्द करून 100% अनुदान देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, चेन फेन्सिंगसाठी अतिरिक्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सौर कुंपण आणि चेन फेन्सिंग यामुळे व्याघ्र प्रकल्प शेजारील शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल आणि त्यांना शेती सुरक्षितपणे करता येईल. सरकारच्या या निर्णयामुळे जंगलालगतच्या गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.