मित्रांनो 2025 सालातील मान्सूनचा हंगाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान अंदाज संस्थेने वर्तवला आहे. या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात सरासरीच्या सुमारे 103 टक्के पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे, जे सामान्य मान्सूनचे संकेत मानले जातात.
हा अंदाज 5 टक्क्यांच्या फरकासह बदलू शकतो. हवामानातील जागतिक बदल घडवून आणणाऱ्या एलनिनोचा परिणाम यंदा विशेष जाणवणार नाही, असे स्कायमेटने स्पष्ट केले आहे. एलनिनो दक्षिणी दोलन (ENSO) या वर्षी निष्क्रिय राहणार असल्यामुळे त्याचा मान्सूनवर नकारात्मक प्रभाव होण्याची शक्यता कमी आहे.
पावसाला पूरक हवामान घटक
हिंदी महासागरातील आयओडी (Indian Ocean Dipole) ही स्थिती यंदा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. ही स्थिती सकारात्मक असली की अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून अधिक वाफ तयार होते, ज्यामुळे देशभरात समाधानकारक पाऊस पडतो.
जुलै-ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ला निना ही स्थिती यंदा कमकुवत आणि अल्पकालीन असेल. त्यामुळे मान्सूनवर त्याचा नकारात्मक परिणाम फारसा होणार नाही. विशेषता जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी पाण्याचा तुटवडा भासणार नाही – जे कृषी क्षेत्रासाठी एक सकारात्मक बाब ठरेल.
प्रादेशिक पावसाचा अंदाज
राज्यनिहाय पावसाच्या वितरणावर नजर टाकल्यास, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांमध्ये समाधानकारक, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात विशेषतः अधिक पावसाची शक्यता आहे. यामुळे जलसाठे वाढण्याची शक्यता असून, जलविद्युत प्रकल्प, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना याचा लाभ होईल.
दुसरीकडे, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये, विशेषता जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महिन्यानुसार पावसाचा अंदाज
- जून — 96% (सुमारे 165.3 मिमी)
- जुलै —102% (सुमारे 280.5 मिमी)
- ऑगस्ट — 108% (सुमारे 254.9 मिमी)
- सप्टेंबर — 104% (सुमारे 167.9 मिमी)
या चार महिन्यांमध्ये ऑगस्ट महिना सर्वाधिक पावसाळा असण्याची शक्यता आहे. हा पाऊस कृषी पिकांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
भारतीय हवामान खात्याच्या वर्गीकरणानुसार, 96% ते 104% पाऊस सामान्य तर 105% ते 110% पाऊस सामान्यपेक्षा अधिक श्रेणीत मोडतो. यंदाचा मान्सून या दोन्ही श्रेणींमध्ये येण्याची शक्यता असल्यामुळे अपुऱ्या पावसाचा धोका फारच कमी आहे.
सामान्यता मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि नंतर संपूर्ण देशभर पसरतो. यंदाचा मान्सूनही असाच नियमित आणि पोषक राहील, अशी शक्यता आहे, जी देशातील शेती, जलस्रोत व संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी आशादायक आहे.