मंडळी राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळतो. जुलै 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 9 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.
पण या योजनेमुळे राज्य सरकारवर मोठा आर्थिक भार पडत असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. त्याचबरोबर, इतर योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेत वळवण्यात येतोय, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे योजनेविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारने या योजनेत कोणताही खंड न पडू देता ती सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी, पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनेतून महिलांना दरमहा 1,500 ऐवजी 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप लाभार्थींना वाढीव रक्कम मिळालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात घोषणा होईल, अशी अपेक्षा होती, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे वाढीव रक्कम प्रत्यक्षात कधी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते दिले गेले आहेत. काही महिलांना अतिरिक्त रक्कम देखील मिळाली आहे. जे हप्ते रखडले आहेत, ते पुढील महिन्यात मिळतील. योजनेत बसणाऱ्या आणि राहिलेल्या महिलांचा आढावा घेऊन योग्य ती मदत केली जाईल. एप्रिलचा हफ्ता लवकरच जमा होईल.