मंडळी देशभरातील हवामानात सातत्याने बदल होत असून त्याचा महाराष्ट्राच्या वातावरणावरही परिणाम जाणवत आहे. काही भागांमध्ये तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह इतर जिल्ह्यांच्या हवामानाबाबत बोलायचे झाल्यास, आज मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत कमाल तापमान 29.22 अंश सेल्सियस तर किमान तापमान 23.99 अंश सेल्सियस राहू शकते. आर्द्रतेचे प्रमाण 54 टक्के असल्यामुळे वातावरणात उष्णता जाणवेल. तसेच मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. मराठवाड्यातही काही भागांत विजांसह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाने अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अवकाळी पावसाच्या आणि गारपीटीच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. हवामानातील हे अनपेक्षित बदल शेती पिकांसाठी नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.