मंडळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने या शेतकऱ्यांना योजनेत पुन्हा सहभागी होण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला असून त्यांना 2,000 रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे. या साठी अर्ज प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
पंतप्रधान किसान योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत 19 हप्त्यांचे वितरण झाले असून एकूण 38,000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. लवकरच 20 वा हप्ता जाहीर होणार आहे.
अनेक शेतकरी कागदपत्रांतील त्रुटी, जमीन मालकीतील बदल, बँक खात्याच्या चुका किंवा शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले. काहींना सुरुवातीचे काही हप्ते मिळाले, पण नंतर थांबले. त्यामुळे त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
या पार्श्वभूमीवर शासनाने योजनेची नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषता लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. अर्ज करताना शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमीन नोंदणी प्रणालीमध्ये नोंदलेले असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक या योजनेसाठी जोडलेले असणे गरजेचे आहे.
शेतकरी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे https://pmkisan.gov.in. या संकेतस्थळावर नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडून, आधार व मोबाईल क्रमांक भरून ओटीपीद्वारे खाते तयार करता येते. त्यानंतर वैयक्तिक माहिती, जमीन तपशील आणि बँक खाते यांची माहिती भरून अर्ज सादर करावा लागतो.
ऑफलाइन अर्जासाठी शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालय, कृषी सहायक कार्यालय किंवा कॉमन सेवा केंद्रांमध्ये जाऊन अर्ज सादर करावा.
सध्या नवीन अर्जदारांना मागील हप्ते मिळणार की नाही, याबाबत सरकारने अद्याप स्पष्टता दिलेली नाही. मात्र पुढील लाभ निश्चित मिळवण्यासाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.