मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडत आहे. अमेरिकेने जशास तसे या धोरणांतर्गत आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या प्रत्युत्तरादाखल चीन, कॅनडा आणि इतर देशांनीही अमेरिकन वस्तू व सेवांवर कर लागू केला आहे. या टॅरिफ युद्धामुळे जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली आहे, अनेक देशांचे शेअर बाजार कोसळले आहेत, आणि सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषता खाद्यतेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ का होत आहे?
मीडिया रिपोर्टनुसार, भारतामध्ये सोया तेल आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीत घट झाल्याने फेब्रुवारी महिन्यात खाद्यतेलाची आयात गेल्या चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. पाम तेलाच्या आयातीत मात्र जानेवारीच्या तुलनेत सुधारणा दिसून आली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा वनस्पती तेल आयातदार आहे. सलग दोन महिन्यांपासून आयात कमी असल्याने देशातील खाद्यतेल साठा घटला आहे. परिणामी, पुढील काही महिन्यांत भारताला मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करावी लागणार आहे, ज्यामुळे मलेशियन पाम तेल आणि अमेरिकन सोया तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आयातीतील बदल आणि त्याचा प्रभाव
डीलर्सच्या अंदाजानुसार, फेब्रुवारीमध्ये पाम तेलाची आयात ३६% वाढून ३,७४,००० मेट्रिक टन झाली आहे. जानेवारीत मात्र ही आयात २०११ नंतरच्या सर्वात कमी पातळीवर पोहोचली होती. तुलनेत, सोया तेलाची आयात फेब्रुवारी महिन्यात ३६% घटून २,८४,००० मेट्रिक टन झाली, तर सूर्यफूल तेलाची आयात २२% घसरून २,२६,००० मेट्रिक टन झाली आहे.
भारत मुख्यता इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पाम तेल, तर अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून सोया तेल आणि सूर्यफूल तेल आयात करतो. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आयात घटल्यानंतर मार्चपासून खाद्यतेलाची आयात पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, वनस्पती तेलाच्या किमतीत दरवर्षी ६ रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या खाद्यतेलाचे दर खालीलप्रमाणे वाढले आहेत.
- वनस्पती तेल – ₹१७० — ₹१७६ प्रति लिटर
- सोया तेल – ₹१५८ — ₹१६३ प्रति लिटर
- सूर्यफूल तेल – ₹१७० — ₹१८१ प्रति लिटर
- पाम तेल – ₹१४३ — ₹१४६ प्रति लिटर
जागतिक टॅरिफ युद्धाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे घरगुती खर्चात वाढ होईल. भारतासारख्या देशांना पर्यायी उपाययोजना करावी लागतील, जसे की स्थानिक उत्पादन वाढवणे किंवा अन्य देशांमधून स्वस्त आयात पर्याय शोधणे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता लवकर कमी होईल का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.