मित्रांनो महिलांसाठी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या महिलांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा रु. 1500 जमा केले जात आहेत. जुलै 2024 ते मार्च 2025 दरम्यान योजनेचे हप्ते नियमितपणे मिळाले आहेत.
सध्या सर्वांच्या नजरा एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे लागलेल्या असताना, याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने, म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी एप्रिलचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अक्षय तृतीयेचा सण अधिक गोड ठरणार आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येबाबत सध्या चर्चेला उधाण आले आहे. काही जण पात्र ठरत असताना, काही अपात्र ठरत आहेत. यासंदर्भात महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की, बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्या अर्जदारांविरोधात पोलीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तटकरे यांनी स्पष्ट केले की, बनावट अर्जदारांना कोणताही आर्थिक लाभ वितरित करण्यात आलेला नाही. तसेच सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई सुरू आहे. योजनेसाठी एकूण सुमारे 11 लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.