नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रातील आगामी हवामानाबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यांच्यानुसार, राज्यात थंडीची सुरुवात कधीपासून होईल, पुढील काही दिवसांत हवामान कसे असेल, आणि पावसाची शक्यता कितपत आहे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला असून दिवाळीचा सणही नुकताच पार पडला आहे. दीपावलीच्या काळात राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची हजेरी होती. या बदलत्या वातावरणामुळे राज्यात थंडी कधीपासून सुरू होणार, हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे.
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, आज आणि उद्या राज्यात अंशता ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पण पावसाचे प्रमाण आता कमी होणार असून महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, असे त्यांनी सांगितले आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील, पण पावसाची शक्यता नाही. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही.
रब्बी हंगामासाठी सध्याचे हवामान अनुकूल आहे, आणि शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आदी रब्बी पिकांच्या पेरण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. ढगाळ वातावरणामुळे काही पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
तसेच, ५ नोव्हेंबरनंतर राज्यात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरपासून थंडी वाढेल, ज्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना आणि फळबागांना पोषक परिस्थिती निर्माण होईल.