मित्रांनो या आठवड्यात महाराष्ट्रावर हवेचा दाब 1012 हेप्टापास्कलपर्यंत राहण्याची अपेक्षा आहे. यामुळे कमाल आणि किमान तापमानात थोडीशी घट होईल. हवामान सौम्य थंडीचे आणि कोरड्या हवामानाचे राहील, जे गहू, हरभरा, मोहरी, जवस, ज्वारी, ऊस, हळद, आले, सुरण आणि बटाट्यासारख्या पिकांसाठी फायदेशीर ठरेल. सकाळच्या आणि दुपारच्या आर्द्रतेत घट होऊन हवामान कोरडे राहील.
रामचंद्र साबळे यांच्या माहितीनुसार, या आठवड्यात हवामान स्थिर राहील, आणि फारसे बदल जाणवणार नाहीत. सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी असला, तरी त्याचा प्रभाव प्रखर राहील. यामुळे पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. बुधवार ते शुक्रवार दरम्यान दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडा थंडावा जाणवेल आणि पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव थोडा वाढू शकतो, विशेषतः आंब्याच्या मोहरावरील तुडतुड्यांचे प्रमाण.
वाऱ्याचा वेग साधारणता ताशी राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये आज अल्पशा प्रमाणात हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम-मध्य आणि पूर्व विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्रात आग्नेयेकडून राहील, त्यामुळे थंडीचे प्रमाण सौम्य राहून हवामान कोरडे राहील.
पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान, पेरूच्या जवळ 18 अंश सेल्सिअस, आणि इक्वेडोरच्या जवळ 26 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. यामुळे ला-निनाच्या प्रभावात घट होईल. तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 28 अंश सेल्सिअस आणि हिंदी महासागराचे पाण्याचे तापमान 30 अंश सेल्सिअस राहील, ज्यामुळे मोठे हवामान बदल होण्याची शक्यता कमी आहे.