मित्रांनो मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा अचानक पावसाने हजेरी लावली. विशेषता दक्षिण मुंबईतील काही भागांसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. यासोबतच राज्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पाऊस पडला असून काही भागांमध्ये गारपीट झाल्याचे वृत्त आहे. कोल्हापूरमधील हातकणंगले आणि सांगलीतील कसबेडीगड तसेच जत येथे प्रत्येकी दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत हवामान कोरडे राहील असा अंदाज वर्तवला आहे. तरीही राज्याच्या काही भागांत हवामान पावसासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. हवामानात झालेल्या या अचानक बदलामुळे चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बीड, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गारपीट वादळाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवली आहे.
रविवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, वाशीम, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर सोमवारी वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट तर भंडारा आणि गोंदियासाठी पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.