मित्रांनो सध्या हवामानातील बदल नागरिकांच्या आरोग्यावर प्रभाव टाकत आहेत. उत्तर भारतातून येणारे गार वारे राज्यात थंडीचा कडाकाही वाढवत आहेत. हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच अवकाळी पावसाचा इशाराही दिला आहे.
हवामानातील या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे, कारण अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. हवामान विभागाने मराठवाडा, मध्य व उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.
सोमवारी मुंबईत १३ अंश आणि पुण्यात १३.८ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पारा १२ अंशांच्या खाली गेला आहे. नागपूर (११.२), अमरावती (११.९), गोंदिया (११.४), आणि गडचिरोली (१२.०) येथील तापमानाची तीव्रता वाढली आहे. नाशिक (१४.७), कोल्हापूर (१६.१), सोलापूर (१७.२), आणि सातारा (१२.८) येथेही थंडीचा प्रभाव जाणवला आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस पडल्यास पिकांच्या नुकसानीचा धोका अधिक वाढेल.