देशामध्ये ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत. या काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशामध्ये ७५.४ मिमी पाऊस पडतो. यंदा ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा शक्यता असून, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातदेखील त्याची नोंद होईल, असे हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी जाहीर केले.
यंदा हवामान विभागाने नैर्ऋत्य मान्सूनमध्ये १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार अधिक पाऊस झाला. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान ईशान्य मान्सूनदेखील सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याचे
संकेत दिले आहेत. ईशान्य मान्सून आणि मान्सूनोतर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडत असतो. यंदाच्या हंगामात दक्षिण भारतात ११२ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
मान्सून वारे गेल्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा सीमावर्ती भाग, रायलसीमा, केरळ, दक्षिणअंतर्गत कर्नाटक या भागात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होतात. ते बंगालच्या उपसागरावरून बाष्प घेऊन येतात आणि दक्षिण भारतात पाऊस आणतात. २०२३चा पाऊस पाहता २०२४चा अंदाज राज्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तो तंतोतंत खरा ठरल्याचा आनंद आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख, कृष्णानंद होसाळीकर म्हणाले.
विषुववृत्तीय प्रशांत महासागरावरील ‘ला नीना’मुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ला नीनाचा प्रभाव हा भारतात ईशान्य मान्सूनवर होत असतो. तामिळनाडू व पुद्दुचेरीमध्ये ‘ला नीना’ दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो.
महाराष्ट्रात ५ आणि ६ तारखेला जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ५ आणि ६ ऑक्टोबरला मुख्यत: विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसांत या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.