नमस्कार मित्रानो राज्यात परतीच्या पावसाने आगमन केल्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे, आणि लवकरच हवामानात उघडीप येण्याची शक्यता आहे. आज, 14 ऑक्टोबर रोजी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही भागांवर वादळी वारे, विजा आणि पावसाच्या हलक्या सरींची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. राज्यभरात कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला तापमान वाढल्यामुळे कमाल तापमान 36 अंशांच्या पुढे गेले होते. परंतु परतीच्या पावसामुळे तापमानात घट झाली आहे. 13 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंतच्या 24 तासांच्या कालावधीत परभणी येथे 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, हे राज्यातील उच्चांकी तापमान होते. पुढील काही दिवस उन्हाच्या तीव्रतेत थोडा बदल अपेक्षित आहे.
परतीचा मॉन्सून
उत्तर भारतातून मॉन्सूनची माघार सुरू झाली असून, आज 14 ऑक्टोबर रोजी कोकणातील पालघर, ठाणे, तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांत सतर्कतेचा इशारा दिला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास काहीसा थांबलेला आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांवरून मॉन्सून माघारी फिरला असला, तरी मागील आठवडाभरात या प्रक्रिया थांबली आहे. 11 ऑक्टोबर रोजी मॉन्सूनने उत्तर भारतातून माघार घेतली होती, मात्र महाराष्ट्रात ही प्रक्रिया काहीशी संथ आहे. हवामान पोषक झाल्यानंतर दोन दिवसांत मॉन्सून आणखी माघारी फिरण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याच वेळी, बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांमुळे 14 ऑक्टोबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा श्रीलंकेपर्यंत सक्रिय असल्याचे निरीक्षण आहे.