मित्रांनो भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील २४ राज्यांमध्ये वादळ व विजेचा इशारा दिला आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिहार, छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील बहुतांश भागांमध्ये तापमान कमी होण्याची शक्यता असून, नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल. मात्र काही भागांमध्ये वादळ व पावसाच्या इशाऱ्याबरोबरच उष्णतेच्या लाटेचाही धोका कायम आहे.
सिक्कीममध्ये काल सततच्या पावसामुळे भूस्खलन झाले असून त्यामुळे सुमारे १०००हून अधिक पर्यटक अडकले होते. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र मंगन जिल्ह्यात अद्यापही १५००हून अधिक पर्यटक अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाने तात्पुरते पर्यटन परवाने रद्द केले असून, टूर ऑपरेटर्सना उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पर्यटक न पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे.
आज हवामान अंदाजानुसार आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, गोवा, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये वादळ आणि विजेच्या कडकडाटाची शक्यता आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि सिक्कीममध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
बिहार, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक, केरळ आणि छत्तीसगडमध्ये तीव्र उष्णतेची स्थिती राहण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील शिक्षण विभागाने उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सकाळच्या सभा रद्द करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना उष्णतेशी संबंधित आजारांविषयी जागरूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे तसेच शाळांनी अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि विद्यार्थ्यांनी डोकं झाकून बाहेर पडावे यासाठी सूचनाही दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना दिवसातून अनेक वेळा पाणी पिण्यासाठी विश्रांती देणे आणि प्राथमिक उपचार किटमध्ये ORS पॅकेट्स ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज पाहता, २७ एप्रिल रोजी छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि विदर्भात गारपीटीची शक्यता आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, कर्नाटक, मराठवाडा आणि केरळमध्ये जोरदार पाऊस होण्याचा इशारा आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका राहणार आहे तर राजस्थानमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज आहे.
२८ एप्रिलला नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, केरळ, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये गारपीट होण्याची शक्यता असून पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट कायम राहील. राजस्थानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान वाढण्याची शक्यता आहे.
२९ एप्रिल रोजी केरळ, कर्नाटक, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम राहणार आहे.