मित्रांनो राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेची लोकप्रियता वाढत असतानाच काही ठगांनी तिचा गैरफायदा घेतला आहे. मानखुर्द परिसरात ६५ महिलांच्या नावावर तब्बल २० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असू शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या फसवणुकीत मानखुर्दमधील एका महिलेसह आणखी चार ते पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एका खासगी वित्त कंपनीतील दोन कर्मचारीही या कटात सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारने गेल्या वर्षी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. मात्र, कागदपत्रांतील त्रुटीमुळे काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. हीच संधी साधून आरोपींनी या महिलांची दिशाभूल करत फसवणूक केली.
मोबाईल आणि छायाचित्रांच्या माध्यमातून फसवणूक
आरोपींनी महिलांना कोणतीही स्पष्ट माहिती न देता त्यांच्या नावावर खासगी फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मंजूर करून घेतले आणि त्या रकमेतून महागडे आयफोन खरेदी केले. महिलांना कुर्ला आणि अंधेरी येथील मोबाईल दुकानांत नेऊन मोबाईलसह त्यांची छायाचित्रे घेतली गेली. नंतर मोबाईल लगेच परत घेतले गेले.
या मोबदल्यात महिलांना केवळ २ ते ५ हजार रुपये देण्यात आले आणि हीच लाडकी बहीण योजनेतील पहिली रक्कम असल्याचे सांगण्यात आले. पुढील हप्ते थेट खात्यावर जमा होतील, असेही आमिष दाखवण्यात आले. वास्तविक, ही रक्कम कर्जाची असल्याचे त्यांना माहितही नव्हते.
फसवणूक उघडकीस कशी आली?
या महिलांनी अनेक महिन्यांपासून कर्जाचे हप्ते भरले नव्हते. त्यामुळे फायनान्स कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी मानखुर्द परिसरात जाऊन संबंधित महिलांची भेट घेतली. त्यानंतर ही संपूर्ण फसवणूक उघडकीस आली.
पोलिसांची कारवाई सुरू
आतापर्यंत ६५ महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र हा आकडा आणखी वाढू शकतो. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, अशी माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मधू घोरपडे यांनी दिली.