नमस्कार मोदी सरकारने टोल कराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भात नवे नियम जाहीर केले आहेत. यानुसार, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (GNSS) वापरणाऱ्या खासगी वाहनचालकांना टोल करमुक्त प्रवासाची संधी मिळणार आहे. तसेच जर वाहनचालकांनी टोल रस्त्याचा वापर 20 किलोमीटरच्या मर्यादेत केला तर त्यांना कोणताही टोल भरावा लागणार नाही. या नियमांचे संपूर्ण देशभरात पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परिवहन मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर दररोज 20 किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या खाजगी वाहनचालकांना करमुक्त प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. ही सूट केवळ GNSS प्रणाली कार्यरत असलेल्या वाहनांसाठी लागू असेल. 20 किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास केल्यास प्रत्यक्ष प्रवासाच्या अंतरानुसार टोल आकारला जाईल.
काही दिवसांपूर्वी फास्टॅग प्रणालीसह GNSS आधारित टोल प्रणाली रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने लागू केली होती. सध्या या प्रणालीचा वापर देशभरात व्यापक स्वरूपात करण्यात आलेला नसला तरी, कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग 275 च्या बेंगळुरू-म्हैसूर विभागात आणि हरियाणातील राष्ट्रीय महामार्ग 709 च्या पानिपत-हिसार महामार्गावर पथदर्शी प्रकल्पाच्या रूपात हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांच्या यशस्वितेनंतर, सरकार देशातील इतर महामार्गांवरही GNSS प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे.