मंडळीभारतात राहण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाकडे विविध कागदपत्रे असणे आवश्यक आहे, कारण दैनंदिन व्यवहारांसाठी अनेक ठिकाणी त्यांची आवश्यकता भासते. या कागदपत्रांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांचा समावेश आहे. विशेषता, आधार कार्ड हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे दस्तऐवज आहे आणि देशातील सुमारे ९०% लोकांकडे आधार कार्ड उपलब्ध आहे.
सर्वसाधारणपणे लोक अनेक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरतात, आणि त्यामुळे काही जण जन्मतारखेचा पुरावा म्हणूनही त्याचा वापर करू इच्छितात. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निकालानुसार, जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरता येणार नाही. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने आधार कार्ड हा जन्मतारखेचा वैध पुरावा नाही असे स्पष्ट केले आहे.
ही बाब एका प्रकरणाशी संबंधित आहे, जिथे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देताना जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड नाकारण्यात आले. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने आधार कार्डला जन्मतारखेचा पुरावा मानले असले तरी सर्वोच्च न्यायालयाने फक्त शाळा सोडल्याचा दाखला (SLC) हाच वैध पुरावा असल्याचे ठरवले आहे.
UIDAI म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने २०२२ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट केले होते की आधार कार्ड हा फक्त ओळखपत्र म्हणून वापरता येईल, जन्मतारखेचा पुरावा म्हणून नाही.