मंडळी राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून यावर्षी महायुतीने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर संपन्न होणार आहे. याचवेळी महायुतीच्या मंत्रीमंडळाची देखील अधिकृत घोषणा करण्यात येईल. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने नागरिकांना अनेक आश्वासने दिली होती. ही आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होतील का, की सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
एसटी महामंडळाचा भाडेवाढ प्रस्ताव
दरम्यान, एसटी महामंडळाने १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर एसटीच्या प्रवासाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. मुंबई ते पुणे प्रवासासाठी ५० ते ६० रुपयांची अतिरिक्त रक्कम मोजावी लागू शकते. याआधी २०२१ मध्ये एसटी महामंडळाने शेवटची भाडेवाढ केली होती, त्यानंतर आजवर भाडेवाढ करण्यात आलेली नव्हती.
एसटी महामंडळाचा आर्थिक तोटा
एसटी महामंडळ सध्या मोठ्या आर्थिक अडचणीतून जात आहे. महामंडळाला दररोज सुमारे १५ कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचे सांगितले जात आहे. इंधन दरवाढ, सुट्ट्या भागांच्या किंमतीत वाढ, तसेच टायर आणि लुब्रिकंटच्या किंमती वाढल्यामुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा आला आहे. कर्मचारी वेतनात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळेही महामंडळावर अतिरिक्त ताण आहे.
सरकारचा पुढील निर्णय महत्त्वाचा
एसटी महामंडळाचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे आहे. निवडणुकीपूर्वी हा प्रस्ताव होल्डवर ठेवण्यात आला होता, परंतु आता सरकार यावर कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाडेवाढीचा निर्णय घेणे सरकारसाठी आव्हानात्मक ठरणार आहे, कारण यामुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
नव्या सरकारकडून दिलेली आश्वासने आणि वास्तव परिस्थिती यांचा मेळ कसा बसवला जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.