नमस्कार मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी ठाम मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी केली आहे.
रिसोड येथे आयोजित पत्रकार परिषदेत या मागणीविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. परिषदेत सुरुवातीला शेतकरी नेते (कै.) शरद जोशी आणि लोकनेते गोपीनाथ मुंढे यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर श्री. भुतेकर यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या काळात सोयाबीन उत्पादक शेतकरी बाजारातील दर घसरल्यामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. या संकटावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपयांची मदत देणे अत्यावश्यक आहे.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारकडे सादर करण्यात आले आहे. सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपासून एक लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे अभियान हाती घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या अभियानाची सुरुवात स्वतःच्या रक्ताने सही करून केली जाईल, अशी घोषणा श्री. भुतेकर यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तातडीची मदत आवश्यक
वाशीमसह पश्चिम विदर्भातील शेतकरी कापूस आणि सोयाबीनाच्या घसरलेल्या भावामुळे अत्यंत अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्वरित मदतीचे पाऊल उचलले नाही, तर शेतकऱ्यांमध्ये आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सोयाबीन पिकाच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी, पीककर्जाची परतफेड करणे आणि पुढील खरिपाच्या पेरणीसाठी भांडवल उभे करणे शेतकऱ्यांना कठीण होईल, असेही श्री. भुतेकर यांनी स्पष्ट केले.
हिवाळी अधिवेशनात निर्णय अपेक्षित
राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना मदतीची ठोस घोषणा होत नाही, तोपर्यंत संघटनेचे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला बाजार समितीचे संचालक रवींद्र चोपडे आणि भूमिपुत्र तालुका समन्वयक महादेव पातळे यांची उपस्थिती होती.