मंडळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी केली आहे. त्यांनी रिसोड येथे पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत माहिती दिली.
सोयाबीन पिकाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परिणामी, त्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भावांतर योजनेच्या माध्यमातून प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी १० हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी श्री. भुतेकर यांनी यावेळी केली.
राज्य सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटना १५ तारखेपासून शेतकऱ्यांच्या एक लाख सह्या गोळा करण्याची मोहीम राबवणार आहे. या मोहिमेची सुरुवात स्वतःच्या रक्ताने सही करून करण्यात येईल, असे श्री. भुतेकर यांनी जाहीर केले.
वाशीम जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी पडलेल्या भावामुळे अडचणीत आले आहेत. जर राज्य सरकारने तातडीने मदत केली नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती संघटनेकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे भविष्यात पीककर्जाची परतफेड तसेच खरीप हंगामाच्या पेरणीत अडथळे येऊ शकतात.
हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदतीची घोषणा करावी, अशी ठाम मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलने तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेस बाजार समितीचे संचालक रवींद्र चोपडे, भूमिपुत्र तालुका समन्वयक महादेव पातळे यांची उपस्थिती होती. संघटनेने शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला असून, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली आहे.सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना संघर्ष करत राहील.