मंडळी महावितरणने स्मार्ट प्रीपेड वीज मीटरविरोधात होणाऱ्या विरोधाला शांत करण्यासाठी एक प्रभावी उपाय शोधला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने एक नवीन प्रस्ताव आणला आहे, ज्याअंतर्गत स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांना दिवसा वीज स्वस्त मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना प्रति युनिट १ रुपयाची सूट मिळणार आहे.
महावितरणला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर बहुवार्षिक दर याचिका दाखल करणे आवश्यक आहे. या याचिकेत, कंपनीने स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती ग्राहकांसह सर्व ग्राहकांना टाइम ऑफ द डे (टीओडी) टॅरिफचा लाभ मिळावा, अशी परवानगी मागितली आहे. आयोग आता जनसुनावणी घेऊन यावर निर्णय घेईल. सध्या, ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीज भार २० किलोवॉटपेक्षा जास्त आहे, त्यांनाच टीओडी टॅरिफ लाभ मिळतो. औद्योगिक ग्राहकांना रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत प्रति युनिट १.५ रुपये सवलत दिली जाते.
महावितरणच्या म्हणण्यानुसार, विजेची मागणी कमी असताना उद्योगांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. स्मार्ट मीटर बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना देखील याचा लाभ मिळणार आहे. महावितरणचा असा विश्वास आहे की, सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सौरऊर्जा मिळते, आणि त्याचा सरासरी दर पारंपरिक वीज केंद्रांच्या दरापेक्षा खूपच कमी, म्हणजे ३.२५ पैसे प्रति युनिट आहे. या योजनेचा फायदा स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांना होईल.
सध्या जो स्मार्ट मीटर वापरणाऱ्या ग्राहकांचा तासाभराचा वापर ट्रॅक केला जात नाही, त्यामुळे त्यांना टीओडी टॅरिफचा लाभ मिळू शकत नाही. पण आता स्मार्ट मीटरद्वारे ही माहिती मिळविण्याची सुविधा उपलब्ध होईल, आणि ग्राहकांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होईल. महावितरणच्या मते, या योजनेमुळे घरगुती ग्राहकांना प्रति युनिट सुमारे १ रुपयाची बचत होईल.
महावितरणने २.४१ कोटी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी २६ हजार कोटी रुपयांचा खर्च होईल. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तसेच ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनमध्ये मीटर बसविण्याची प्रक्रिया देखील संपन्न झाली आहे.
पण विरोधाच्या कारणामुळे घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी हटवून ग्राहकांना टीओडी टॅरिफचा लाभ देण्यात येईल. स्मार्ट मीटरमध्ये पोस्ट पेड आणि प्री पेड दोन्ही सुविधा उपलब्ध असणार आहेत, आणि जिल्ह्यात ३ लाख ९८ हजार घरात हे स्मार्ट मीटर बसवले जातील.