नमस्कार राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, आणि त्यासाठी आता प्रचाराची जोरात सुरुवात झालेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. नुकतेच महायुतीने कोल्हापूर येथे एक भव्य संयुक्त सभा आयोजित केली. ही सभा 5 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली, आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विकासासाठी दहा महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली.
1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी याच ठिकाणावरून प्रचाराची सुरुवात केली होती, त्यामुळे या सभेला एक ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. एकनाथ शिंदे यांनी, आई अंबाबाईचे आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत आहेत, आणि यावेळीही विजयासाठी आम्हाला तिचा आशीर्वाद मिळेल, असे सांगितले. त्यांनी 23 तारखेला विजय साजरा करण्यासाठी पुन्हा येथे येण्याचे आश्वासनही दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सभेत जाहीर केलेल्या दहा महत्त्वाच्या घोषणा पुढीलप्रमाणे आहेत.
1) महिलांना आर्थिक मदत – लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये देण्यात येणार आहेत, ही रक्कम पूर्वी 1500 रुपये होती. तसेच, महिलांच्या सुरक्षिततेसाठी 25000 महिलांना पोलिस दलात सामावून घेणार आहे.
2) शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी – शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 15000 रुपये दिले जातील, आणि एमपीएसवर 20 टक्के अनुदान उपलब्ध असेल.
3) अन्न आणि निवारा – गरिबांना अन्न, वस्त्र, आणि निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील.
4) वृद्धांसाठी पेन्शन योजना – वृद्ध पेन्शनधारकांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातील पूर्वी ही रक्कम 1500 रुपये होती.
5) जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे – जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू नयेत याची खबरदारी घेणार आहे.
6) रोजगार निर्मिती – 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा उद्देश आहे, तसेच प्रशिक्षणासाठी दर महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचे विद्या वेतन दिले जाईल.
7) पाणंद रस्ते – 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे.
8) अंगणवाडी आणि आशा सेविकांसाठी वेतनवाढ – अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला 15000 रुपये वेतन आणि संरक्षण मिळेल.
9) वीज बिलात कपात – वीज बिलात 30 टक्के कपात केली जाईल, तसेच सौर आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रावर विशेष भर दिला जाईल.
10) व्हिजन महाराष्ट्र 2029 – सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर केला जाईल.
या घोषणांमुळे राज्यातील नागरिकांमध्ये एक नवीन आशा निर्माण झाली आहे, आणि आगामी निवडणुकीत या योजनांचा काय परिणाम होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.