मंडळी महसूल विभागाने 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात मोठे बदल केले आहेत. सातबारा उतारा हा शेतीच्या जमिनीच्या मालकीचा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जमिनीच्या खरेदी-विक्री, कर्जप्रक्रिया आणि मालमत्तेशी संबंधित वादांमध्ये तो मोठी भूमिका बजावतो. या 11 बदलांमुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि अचूक होईल.
पहिला बदल म्हणजे गावाचे नाव आणि कोड नंबर आता स्पष्टपणे दाखवले जातील. गाव नमुना 7 उताऱ्यावर गावाचा कोड नंबर (स्थानिक सरकारी निर्देशिका) दर्शवला जाईल. दुसरा बदल हा जमिनीच्या क्षेत्रफळात अधिक स्पष्टता आणण्यासाठी करण्यात आला आहे. लागवडीयोग्य आणि इतर क्षेत्र वेगवेगळे दर्शवले जात होते, आता त्यांची एकत्रित बेरीज केली जाईल. तिसऱ्या बदलानुसार, शेतीच्या जमिनीचे क्षेत्र हेक्टरमध्ये मोजले जाईल, तर बिगर शेतीसाठी चौरस मीटर ही मोजणी पद्धत वापरण्यात येईल.
चौथा बदल म्हणजे खाते क्रमांक आता खातेधारकाच्या नावासमोर स्पष्टपणे दिसेल. पूर्वी हा क्रमांक इतर हक्क या स्तंभात दिला जात होता. पाचव्या बदलानुसार मृत व्यक्तीच्या नोंदी पूर्वी कर्जाच्या बोजासह कंसात दाखवल्या जात असत, पण आता त्यावर आडवी रेषा ओढण्यात येईल. सहाव्या बदलामध्ये प्रलंबित फेरफारांसाठी स्वतंत्र रेकॉर्ड तयार करण्यात येणार आहे, त्यामुळे सुधारणा प्रक्रियेत असलेल्या जमिनींच्या नोंदी व्यवस्थित ठेवता येतील.
सातव्या बदलानुसार जुन्या फेरफार क्रमांकांसाठी स्वतंत्र कॉलम असेल, त्यामुळे जुन्या नोंदी अधिक स्पष्ट होतील. आठवा बदल म्हणजे, दोन खातेधारकांच्या नावामध्ये ठळक रेषा असणार, जेणेकरून त्यांची नावे स्पष्टपणे वाचता येतील. नवव्या बदलानुसार, गट क्रमांकासह शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख “इतर हक्क” स्तंभात शेवटी दिसेल.
दहाव्या बदलानुसार शेती नसलेल्या जमिनींसाठी क्षेत्र मोजणीचे एकक 8 चौरस मीटर असेल आणि महसूल विशेष मूल्यांकन स्तंभ हटवण्यात आला आहे. अकराव्या आणि शेवटच्या बदलानुसार, शेती नसलेल्या जमिनींसाठी सातबारा आणि गाव नमुना बारा लागू राहणार नाही, कारण हे क्षेत्र शेती नसलेल्या जमिनीत रूपांतरित झाले आहे.
या नव्या बदलांमुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत होणार आहे. यामुळे जमिनीशी संबंधित व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि खातेधारकांना त्यांची मालकी, फेरफार आणि नोंदी अधिक अचूक समजतील. महसूल विभागाने घेतलेला हा निर्णय शेती आणि बिगरशेती जमिनीच्या व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.