मंडळी सध्या देशभरात हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी पाऊस पडतो, तर कधी ताशी उकड्यामुळे लोकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीवरून, पूर्वोत्तर भारतात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याचप्रमाणे, उत्तर भारतात उष्णतेची लाट तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने आगामी काही दिवसांच्या हवामानाचा अंदाज दिला असून, ढगाळ वातावरणामुळे काही भागात उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाल्याचे दिसून आले आहे.
यलो अलर्ट जारी
एप्रिल महिन्याच्या अखेरीस मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमानात काही प्रमाणात घट होऊन ढगाळ हवामानामुळे मुंबईकरांना उकाड्यातून विश्रांती मिळाल्याचे दिसून आले आहे. विदर्भातील अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही तापमानात थोडी घट झालेली आहे. हवामान विभागाने वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घसरण
पुढील २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तथापि, काही ठिकाणी तापमानात १ ते २ अंशांची घट होऊ शकते. कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा आणि सोलापूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होण्याची अपेक्षा आहे. मराठवाड्यातील धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीडमध्ये सध्या तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सियस दरम्यान आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.