मंडळी राज्यातील हवामान परिस्थितीवर नजर टाकल्यास, विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसत आहे. पुढील पाच दिवस विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून, राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचा जोर मर्यादित राहील, असा अंदाज आहे.
मान्सूनची वाटचाल स्थिर
सध्या मान्सूनची वाटचाल स्थिरावलेली आहे. अरबी समुद्रातील शाखा मागील पाच दिवसांपासून आणि बंगालच्या उपसागरातील शाखा मागील तीन दिवसांपासून एकाच भागात स्थिर आहे. मान्सूनची सीमा सध्या मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट या भागांपर्यंत पोहोचलेली आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही पावसाची स्थिती याच प्रकारची राहील.
विदर्भात पावसाचा जोर टिकून राहणार
विदर्भातील अकोला, चंद्रपूर, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार या दिवशी काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषता नागपूर जिल्ह्यांत आज, सोमवार आणि मंगळवार या दिवशी पावसाचा जोर राहील.
कोकणात हलक्याप्रमाणात पाऊस
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र रायगड, पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस केवळ हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.