Ration Card : मंडळी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट हस्तांतरण (DBT) करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे.
या योजनेअंतर्गत जानेवारी २०२३ पासून लाभार्थ्यांना प्रति महिना प्रति व्यक्ती १५० रुपये रोख स्वरूपात त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यानंतर २० जून २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार ही रक्कम वाढवून १७० रुपये प्रति लाभार्थी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून आधार संलग्न बँक खात्यावर ही रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल. शासनाने योजनेसाठी नवीन लेखाशिर्ष मंजूर केले असून, त्याअंतर्गत या योजनेसाठी निधी वितरित केला जाणार आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन अर्ज सादर करावा. अर्जाचा नमुना संबंधित दुकानात उपलब्ध असेल. अर्जासोबत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत आणि रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत जोडणे आवश्यक आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट आर्थिक मदत मिळणार आहे, ज्याचा उपयोग त्यांच्या इतर गरजांसाठी करता येईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळण्यास मदत होईल.