ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांत पाऊस (१ नोव्हेंबरपर्यंत) पडणार आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे. दरम्यान, हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबरपर्यंतच्या दिवाळीत राज्यात ढगाळ वातावरणासहित विजांच्या
कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यानुसार २९ ऑक्टोबर रोजी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील चार जिल्ह्यांत फक्त ढगाळ, तर उर्वरित जिल्ह्यांत केवळ स्वच्छ वातावरण राहील.
३० ऑक्टोबर रोजी विदर्भात पाऊस पडणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत फक्त ढगाळ वातावरण; तर अकोला, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासहित किरकोळ पाऊस बरसणार आहे.
३१ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण विदर्भ (नागपूर, अमरावती वगळता), उत्तर नगर व उत्तर संभाजीनगर आणि पुणे व सातारा (घाटमाथा) येथील १५ जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासहित किरकोळ पाऊस बरसणार आहे.
१ नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर व उत्तर संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी आणि नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा अशा १२ जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासहित किरकोळ पाऊस पडणार आहे. याबरोबरच २ नोव्हेंबर रोजी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी या १३ जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासहित किरकोळ पाऊस, तर उर्वरित २३ जिल्ह्यांत स्वच्छ वातावरण जाणवणार आहे.
३ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड किरकोळ पाऊस पडणार आहे. तसेच, ४ नोव्हेंबरला रोजी पुणे, सातारा, नगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड येथील सात जिल्ह्यांत फक्त ढगाळ वातावरण राहील. दरम्यान, समुद्रसपाटीपासून दीड कि.मी. उंचीवर उत्तर भारतातून येणारे उत्तरी व पूर्व भारतातून येणारे ईशान्य असे कोरडे वारे, तर बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे यांचा दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात होणार्या मिलाफातून सध्या महाराष्ट्रात आठवडाभरासाठी पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे.