मित्रांनो राज्यात पुन्हा पावसाचे संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे विदर्भ ते केरळ दरम्यान कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याकडे येत आहेत आणि तापमान वाढल्यामुळे उंच ढग तयार होत आहेत. यामुळे पावसाला आणखी मदत मिळत आहे.
तापमानात बदल होणार
राजस्थानमधील वाऱ्यांच्या स्थितीचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. विशेषता पूर्व विदर्भात – नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली – या जिल्ह्यांमध्ये ३ मेपर्यंत पावसाची शक्यता आहे. या काळात जोरदार वारेही वाहण्याचा इशारा दिला गेला आहे. या भागांत तापमानात थोडी घट होणार आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने सांगितले आहे. पावसाच्या या दिवसांनंतर पुन्हा उष्णता वाढू शकते.
अवकाळी पावसाचा फटका
भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वारे आले. गुरुवारी संध्याकाळी काळे ढग दाटले आणि नंतर पाऊस सुरू झाला. धान शेतीसाठी हा पाऊस चांगला असला तरी मका आणि बागायती शेतीचे नुकसान झाले. गोंदियातही विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाला, मका आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीच्या काही भागात गारपिटीसह पाऊस झाला, ज्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
पाण्याची टंचाई नाही
राज्यातील धरणांत १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे राज्यात पाणी टंचाई होणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. उन्हाचे प्रमाण वाढत असले तरी मे महिन्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याबाबत घाबरण्याची गरज नाही.