मंडळी उत्तर भारतातून थंड वारे आणि दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांची टक्कर महाराष्ट्रावर होत आहे. यामुळे हवेच्या वरच्या थरांत झोतवारा (जेट स्ट्रीम विंड) वेगाने वाहत आहे, ज्यामुळे खालच्या थरांतही प्रभाव जाणवतो. परिणामी राज्यात बोचरे वारे, दाट धुके आणि पावसाचे वातावरण तयार झाले आहे. बुधवारपासून पुढील चार दिवस काही भागांत हलक्या सरींचा अंदाज आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांत राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. किमान तापमानाचा सरासरी पारा 9 ते 10 अंशांवरून 18 ते 22 अंशांपर्यंत गेला आहे, तरीही गारठा जाणवत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे झोतवार्याचा वाढलेला प्रभाव. उत्तर भारतात गारठा वाढला आहे, आणि जम्मू-काश्मीर ते मध्य प्रदेशपर्यंतच्या राज्यांतही थंडी आहे.
महाराष्ट्रात उत्तर व दक्षिण वाऱ्यांची टक्कर होत असल्याने विचित्र वातावरण तयार झाले आहे. तापमानात वाढ होऊनही, वरच्या थरातील वारे, दाट धुके आणि पावसाचे वातावरण 25 ते 29 डिग्री सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. सध्या धुळे, नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या इतर भागांतही पावसाची शक्यता आहे.
धुके आणि बोचरे वारे येण्याचे कारण म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या दक्षिणोत्तर उभ्या समुद्र क्षेत्रातून वाहणारे वारं, ज्यामुळे कोकण, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि छ. संभाजीनगर या 19 जिल्ह्यांमध्ये प्रचंड आर्द्रता वाढली आहे. हे वारे अरबी समुद्रातून येत असल्याने बोचरे वारे आणि दाट धुके निर्माण होतात.
हवामान तज्ज्ञांच्या मते कांदा, गहू, हरबरा पिकांवर अळी, कीड, बुरशी आणि माव्याचे आक्रमण होऊ शकते. यामुळे कीड आणि बुरशीनाशकांची फवारणी आवश्यक होऊ शकते. तसेच, फुलोर्यातील पिकांच्या परागीभवनावर आणि दाणाभरणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रकाशसंश्लेषणाच्या अभावामुळे अन्नद्रव्याच्या अपुर्या पुरवठ्यातून पिकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, आणि द्राक्षाच्या बागांवरही दमट हवामानाचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
नागपूर: 11.8°C, पुणे: 15.2°C, नाशिक: 14°C, कोल्हापूर: 17.4°C, मुंबई: 21.5°C, रत्नागिरी: 19.7°C, जळगाव: 15°C, महाबळेश्वर: 14.2°C, सांगली: 16.9°C, सातारा: 15°C, सोलापूर: 20.4°C
झोतवारा म्हणजे काय?
उत्तर भारतातून थंड वारे आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे येत आहेत. या दोन्ही वार्यांची टक्कर हवेच्या वरच्या थरांत झोतवारा तयार करते. हवेच्या खालच्या थरांतही याचा प्रभाव दिसतो. या प्रक्रियेमुळे बोचरे वारे सतत वाहत राहतात, आणि तापमानात वाढ होऊनही थंडी जाणवते, तसेच पावसाची शक्यता निर्माण होते.